- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : देशातील जनतेला कोविड १९ प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजेच बुस्टर डोस द्यावा, अशी मागणी काही कॉर्पोरेट कंपन्या आणि वैद्यकीय तज्ज्ञ करीत असले तरी तो दिला जाण्याची शक्यता नाही. कोरोनाविषयक टास्क फोर्सनेच बुस्टर डोसची गरज नसल्याचे म्हटले आहे. सणासुदीचा काळ संपल्यानंतरही कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली नसल्याने केंद्र सरकारचा तणाव कमी झाला आहे. शिवाय अधिकाधिक लोक दुसरा डोस घेण्यासाठी पुढे येत असल्याचे समाधानही आहे.
ऑक्टोबरपुरते बोलायचे तर त्या काळात पहिल्यापेक्षा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.एन. के. अरोरा यांनी लोकमतला सांगितले की, कोरोनाचा प्रभाव भारतात कमी होत आहे. विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रसारही नाही. डेल्टाची ओरड व भीती आहे, प्रत्यक्षात त्याचा संसर्ग मात्र नाही. त्यामुळे तिसऱ्या बुस्टर डोसची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही तिसऱ्या डोसशी शिफारस केलेली नाही.
अमेरिकेतही लाभ नाही
टास्क फोर्सने आपले हे मत केंद्र सरकारलाही कळविले आहे. अमेरिका वा ब्रिटन यासारख्या बुस्टर डोस देण्यात आलेल्या देशांमध्येही त्याचा फार मोठा फायदा झालेला नाही. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनीही याआधी बुस्टर डोसची गरज नाही, असेच मत व्यक्त केले आहे.