गुवाहाटी - देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आसाममधील आरोग्य विभागाला सोविर मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोविशिल्ड कोरोना लसीच्या गोठलेल्या अवस्थेतील एक हजार डोस असलेल्या १०० बाटल्या सापडल्या आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने या प्रकाराच्या तपासाचे आदेश दिले आहेत.हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार आसाममधील बराक व्हॅली क्षेत्रात प्रमुख संशोधन संस्था एसएमसीएचमध्ये लसीचे डोस गोठण्याचे कारण कोल्ड चेन स्टोरेजमध्ये निर्माण झालेला दोष असू शकतो.आरोग्य सेवेचे संचालक मुनींद्र नाथ नकाते यांनी सांगितले की, कोरोनावरील लस गोठलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. साठवणुकीतील दोष हे याचे कारण असून शकते. मात्र याचे खरे कारण हे पूर्णपणे तपास केल्यानंतरच समोर येईल. गोठलेल्या लसींची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये कुणी कुचराई केल्याचे समोर आल्यास त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.दरम्यान, आसाममध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ९० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. या राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसींचे डोस दिले जात आहेत. सोमवारपर्यंत राज्यभरातील सुमारे पाच हजार ५४२ जणांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे.