नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,32,64,175 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,254 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,42,874 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे तब्बल 75 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने भारताचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे.
मनसुख मांडविया यांनी सोमवारी "या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाल्यापासून भारतात 75 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगात लसीकरण सुरू राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील 43 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होईल" असं म्हटलं आहे. तसेच "नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाने 75 कोटी डोसचा आकडा पार केला आहे" असं देखील म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले आहे आहे. कोरोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे भरभरून कौतुक केलं आहे. डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी "डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने कोरोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले 100 दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला 85 दिवस लागले. दरम्यान, भारताने फक्त 13 दिवसांत 650 दशलक्ष कोरोना डोसपासून 750 दशलक्ष कोरोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चिंताजनक! 'कोरोना लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका दहापट जास्त'; रिसर्चमधून मोठा खुलासा
लोकांमध्ये कोरोना लसीबाबत अद्यापही थोडे भीतीचे वातावरण आहे. लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच कोरोनाबाबतच्या रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे. लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक असल्याचं म्हटलं आहे. रिसर्चमधून कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत लस न घेणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण हे दहापट अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे. युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं अमेरिकेतील विविध भागांत हा प्रयोग केला आहे. समोर आलेल्या निष्कर्षांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांच्या मृत्युचं प्रमाण हे लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आढळून आलं आहे. कोरोना लसींची परिणामकारकता सुरुवातीला 90 टक्के होती. मात्र डेल्टाच्या प्रसारानंतर ती कमी होत जाऊन 80 टक्क्यांवर आल्याचं निरीक्षणही यात नोंदवण्यात आलं आहे.