नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2067 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,22,006 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे काही राज्यांची डोकेदुखीही वाढली आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या Exclusive माहितीनुसार, कोरोनाची प्रकरणे वाढत असतानाही लोक अजूनही तिसरा प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या 70 लाख लोकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला नाही, जे कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. 70 लाखांपैकी 46 लाख 15 हजार लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे. त्याच वेळी, 1 कोटी फ्रंटलाइन वर्कर्स प्रिकॉशन डोससाठी पात्र आहेत, परंतु त्यापैकी केवळ 72 लाख फ्रंटलाइन वर्कर्सनी तिसरा डोस घेतला आहे. 60 वर्षांवरील लोकांची लोकसंख्या सुमारे 11 कोटी 60 लाख आहे, त्यापैकी 2 कोटीलोक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत, परंतु यापैकी 1 कोटी 35 लाखांनी बूस्टर डोस घेतला आहे.
18 - 59 वर्षे वयोगटातील लोकांची लोकसंख्या 68 कोटी 46 लाख आहे. त्यापैकी 2 कोटी लोक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत, परंतु आतापर्यंत यापैकी केवळ 3 लाख लोकांना हा डोस घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतच वृत्त दिले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी म्हणून महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीलाच निर्बंधमुक्त झालेल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा पत्र लिहून काही सूचना दिल्या आहे.
केंद्राने या राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यकता भासल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. देशामध्ये यावेळी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे दिल्लीमध्ये सापडत आहेत. येथे पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीसह एकूण पाच राज्यांना कोरोनाविरोधात फाइव्ह फोल्ड रणनीती वापरण्याची सूचना केली आहे. यामध्ये टेस्ट, ट्रेक, ट्रीट, व्हॅक्सिनेशन आणि कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यास सांगण्यात आले आहे.