नवी दिल्ली : भारतात फायझरच्या लसीच्या आपत्कालीन वापराकरिता परवानगीसाठी त्या कंपनीने केंद्र सरकारकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे. ही माहिती फायझरने शुक्रवारी दिली. ब्रिटन, बहारिन या दोन देशांमध्ये फायझरच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर भारतात अशा प्रकारच्या परवानगीसाठी फायझरने तत्काळ अर्ज केला होता. औषध नियंत्रण प्राधिकरणातील (डीआरएआय) तज्ज्ञांच्या समितीच्या ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर फायझरने हा निर्णय घेतला.
आपत्कालीन वापरासाठी फायझरच्या लसीची आणखी काही माहिती तज्ज्ञ समिती मागविण्याची शक्यता होती. ते सर्व लक्षात घेऊन लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी केलेला अर्ज फायझर कंपनीने मागे घेतला आहे. फायझरची लस भारताच्या उपयोगी ठरावी, असाच आमचा प्रयत्न असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. फायझर कंपनीने तिच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या विक्री व वितरण तसेच मानवी चाचण्यांसाठी केंद्र सरकारकडे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात परवानगी मागितली होती. फायझरच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा अमेरिका, ब्रिटनसहित काही देशांमध्ये वापर केला जात आहे.