नवी दिल्ली - देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. एका दिवसात दोन कोटी 22 लाख डोस देण्यात आले आहेत. सर्वाधिक डोस भाजपशासित राज्यांमध्ये टोचण्यात आले. तर यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक 1 कोटी 41 लाख डोस देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी देशभरातील डॉक्टर आणि कोरोनायोद्धांचं अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी लसीकरणाच्या विक्रमावरून अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान, मोदींनी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना 'काल अडीच कोटी लोकांना लस मिळाली, मग एका पक्षाला ताप का आला?' असं म्हटलं. हे ऐकून डॉक्टरही हसले. गोव्यातील 100 टक्के लोकसंख्येला कोविड -19 प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिल्याने आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण लाभार्थ्यांशी संवाद साधला. "लोकांना आम्ही लस दिली तेव्हा त्यांना कोरोनाला रोखण्यासाठी ही लस देत असल्याचं सांगितलं. लसीकरणानंतर तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. लस घेतल्यानंतर मास्क घालणे, हात धुणे आणि अंतर राखणे हे सुरूच ठेवायचे आहे,” असं मोदींसोबत संवाद साधणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी "जेव्हा तुमच्या सांगण्यानंतर नागरिकांनी लस घेतली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला का? मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. कारण मी वैज्ञानिक किंवा डॉक्टर नाही. मी असं ऐकलं आहे की लस घेतल्यानंतर 100 पैकी एका व्यक्तीला त्रास होतो. जास्त ताप आल्यानंतर मानसिक संतुलनही बिघडतं असं डॉक्टर सांगतात. पण मला जाणून घ्यायचं आहे की, काल जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांना लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी काहींना त्रास झाला हे मी ऐकले आहे. पण हे मी पहिल्यांदाच पाहात आहे की अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला आहे. याचं काही लॉजिक असू शकतं का?" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सुखावणारी आकडेवारी! कोरोनाच्या संकटात WHO ने दिली आनंदाची बातमी; जगभरातील रुग्णसंख्येत झाली घट
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या संकटात एक आनंदाची बातमी दिली आहे. WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बळींच्या संख्येतही घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही दक्षिण-पूर्व आशिया भागात झाली आहे. तर आफ्रिकेमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दरात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, इराण आणि तुर्कीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग तब्बल 180 देशांमध्ये झाला आहे. अनेक ठिकाणी तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा अधिक घातक असल्याचं म्हटलं जात आहे.