पुणे – कोरोना लसीकरण मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टीकोनातून मंगळवार सर्वात महत्त्वाचा दिवस ठरला आहे. रशियाची स्पुतनिक व्ही(Sputnik V) लसीचं उत्पादन आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे होणार असल्याची घोषणा झाली आहे. सप्टेंबर महिन्यात स्पुतनिक लसीचं उत्पादनाची पहिली खेप भारतात तयार होईल. त्यामुळे कोविशील्ड, कोव्हॅक्सिननंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लसीमुळे विषाणूविरुद्धच्या लढाईत भारताला आणखी बळ मिळणार आहे.
मंगळवारी रशियन संचालक इन्वेस्टमेंट फंड(RDIF) आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये करार झाला. त्यानुसार स्पुतनिक लसीच्या उत्पादनासाठी सीरमला परवानगी मिळाली आहे. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लसीचं उत्पादन सुरू करण्यासाठी मोठं पाऊल टाकलं आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात सीरमद्वारे लसीचं उत्पादनाची पहिली खेप तयार होईल. या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रत्येक वर्षी ३०० मिलियन(३० कोटी) लसीचे डोस बनवण्यासाठी करार झाला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूट सध्या पुण्यातील त्यांच्या लॅबमध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सची निर्मिती करत आहे. त्याशिवाय यूकेमधील Codagenix ची चाचणीही याठिकाणी घेतली जात आहे. सीरम इन्स्टिटूटप्रमाणे RDIF भारतातील अन्य कंपन्यांसोबतही लस उत्पादन करण्यासाठी करार करत आहे. यात Gland Pharma, Hetero Biopharma, Panacea Biotec, Stelis Biopharma, Virchow Biotech & Morepen अशा कंपन्यांचा समावेश आहे.
काय म्हणाले अदार पूनावाला?
या कराराबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक अदार पूनावाला म्हणाले की, स्पुतनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी RDIF सोबत झालेल्या करारामुळे आम्ही खूप आनंदित आहोत. येणाऱ्या काळात आम्ही लाखो लसीचे डोस बनवण्यासाठी तयार आहोत. कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी जगातील सर्व देश आणि संस्था लसीकरणासाठी एकत्र येण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. स्पुतनिक व्ही भारतात वापरण्यात येणारी पहिली परदेशी लस आहे. आतापर्यंत लाखो भारतीयांना स्पुतनिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचा वापर जगातील एकूण ६७ देशांमध्ये सध्या केला जात आहे.