नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. यामुळे 1 मेपासून खुल्या बाजारात कोरोना लसींची विक्री करण्याची परवानगी कंपन्यांना मिळाली आहे. मात्र 1 मेपासून कोरोनाची लस (Corona Vaccine) मेडिकलच्या दुकानांमध्ये मिळणार नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांना रुग्णालय किंवा लसीकरण केंद्रांमध्येच जावं लागेल. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच लसीकरण करावं लागलं. याच दरम्यान सीरमची (Serum Institute of India ) लस भारतातच (India) सगळ्यात महाग असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंका, बांगलादेशातही 'खासगी'पेक्षा 'कोविशिल्ड' (Covishield ) स्वस्त मिळत आहे.
खासगी रुग्णालयात 1 मे पासून भारतीयांना 600 रुपये प्रत्येकी कोविशिल्ड लस उपलब्ध होणार आहे. जगात या लसीसाठी भारतीयांना सगळ्यात जास्त पैसा मोजावा लागणार आहे. या लसीचे उत्पादन आणि वितरण पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटकडे आहे. पहिले दहा कोटी लसीचे डोस भारत सरकारला 'सीरम'ने 150 रुपयाला दिले होते. आता राज्य सरकारला 400 आणि खासगी हॉस्पिटलला 600 रुपये दराने लसींची खरेदी करावी लागणार आहे. सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी 'कोविशिल्ड लस आम्ही 150 रुपयांत विकली तरी नफ्यात राहू' असं विधान लस बाजारात येण्यापूर्वी केलं होतं. पण सध्याची स्थिती बघता कोविशिल्ड ही जगात भारतात सर्वात जास्त किंमतीला विकली जाते आहे.
कोविशील्ड रेट कार्ड
भारत : 8 डॉलर्स
सौदी : 5.25 डॉलर्स
अमेरिका : 4 डॉलर्स
ब्राझील : 3.15 डॉलर्स
युके: 3 डॉलर्स
युरोपियन युनियन: 2.15 ते 3.50 डॉलर्स
दक्षिण आफ्रिका : 5.25 डॉलर्स
बांगलादेश : 4 डॉलर्स
श्रीलंका : 4.50 ते 5 डॉलर्स
कोरोना लसी बाजारपेठेत येणार पण किंमत किती असणार?
कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्या एका डोसची किंमत 700 ते 1000 रुपयांच्या दरम्यान ठेऊ इच्छितात. सध्याच्या घडीला सरकारनं कोरोना लसीच्या एका डोसची किंमत 250 रुपये ठेवली आहे. खुल्या बाजारात कोविशिल्ड लसीची किंमत प्रति डोस 1 हजार रुपये इतकी असेल, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं आहे.
कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (24 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे.
सिरमनं दिलं असं स्पष्टीकरण -यासंदर्भात सिरम इन्स्टिट्युटकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की जगभरात मिळणाऱ्या कोरोना लशी आणि भारतात उपलब्ध असणाऱ्या कोरोना लशींच्या किंमतींची अयोग्य तुलना केली जात आहे. कोविशील्ड ही आज बाजारात उपलब्ध असलेल्या लशींपैकी सर्वात जास्त परवडणारी लस आहे. सुरूवातीच्या काळात या लशींची किंमत कमी ठेवण्यात आली, कारण जोखीम घेत व्हॅक्सीनची निर्मिती करण्यासाठी त्या-त्या देशांच्या सरकारांनी आधीच निधी उपलब्ध करून दिला होता. कोविशील्डचा भारतासह जगभरातील सरकारी लसीकरण कार्यक्रमासाठी केलेला सुरूवातीचा पुरवठा खूपच स्वस्त किंमतीत करण्यात आला आहे.
सिरम इन्स्टिट्युट उत्पादित होणाऱ्या लसींमधील मोजका साठाच खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रत्येकी दराने विक्री करणार आहे. ही रक्कम कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी अन्य औषधे आणि साहित्याच्या मनाने फार कमी आहे, असेही सिरमने म्हटले आहे.