देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण आहे. पहिल्याच दिवशी देशभरात 1,65,714 लोकांना कोरोना लस टोचण्यात आली. आता या लसीचे साईड इफेक्टही दिसू लागले आहेत. कोरोना लस दिलेल्या एका व्यक्तीला प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करवे लागले आहे.
एकट्या दिल्लीमध्ये ५१ जणांना कोरोना लसीचा साईड इफेक्ट झाला आहे. दिल्लीत पहिल्याच दिवशी 4319 आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लसीचे हे साईडइफेक्ट कमी तीव्रतेचे असल्याचे सांगितले गेले आहे. दक्षिण दिल्लीत ११ जणांना लसीचा त्रास जाणवू लागला.
आरोग्य मंत्रालयानुसार कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लाभार्थ्यांची लिस्ट अपडेट करण्यात उशिर होत असल्याची समस्या जाणवत होती. याशिवाय अनेक ठिकाणी ज्यांचे नाव शनिवारच्या लसीकरणात नव्हते त्यांना लस टोचण्यात आली. आकड्यांनुसार पहिल्या दिवशी 16,755 लस टोचणारे होते, तर १.९० लाख लसीचे लाभार्थी होते.
आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, आम्ही यशस्वीरित्या पुढे जात आहोत. एकत्र मिळून कोरोनाशी लढत आहोत. कोरोना लसीकरणाची सगळी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात आम्ही कोरोनावर चांगल्याप्रकारे विजय मिळविला आहे. गेल्या३-४ महिन्यामधील मृत्यूदर पाहता आम्ही कोरोनावर विजयाच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोरोनाबळींच्या आठवणींनी मोदी भावुक -- कोरोना साथीमध्ये नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. त्याचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. ते म्हणाले की, या साथीमुळे अनेक जण मरण पावले, त्यांच्यावर एकाकी अवस्थेत अंत्यसंस्कार करावे लागले. - अंतिम संस्कारांच्या वेळेस जे पारंपरिक विधी केले जातात तेही या काळात मृतांच्या नातेवाइकांना करता आले नाहीत. कोरोना साथीमुळे अनेक डॉक्टर, आरोग्यसेवक, तसेच कोरोना योद्धे मरण पावले. त्या सर्वांची आठवण काढताना मोदी यांचा कंठ दाटून आला होता.
साथ नष्ट होणे अशक्य -कोरोना साथीचा जगात एकही रुग्ण उरला नाही अशी स्थिती निर्माण होणे अशक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे.