कोरोनाची लस घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे कोव्हिशिल्ड बनविणाऱ्या अॅस्ट्राझिनेकाने मान्य केले आहे. तसेच जगभरातून ही लस माघारी घेतली गेली आहे. अशातच बनारस हिंदू विश्वविद्यालयाने कोरोना लसीपासून आणखी काही साईड इफेक्ट असल्याचे प्रकाशात आणले आहे. यामुळे तरुण, तरुणींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
बीएचयूने केलेल्या संशोधनामध्ये तरुणांमध्ये केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तसेच त्वचा रोग, डोके दुखी आणि तरुणी-महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमित येण्याची समस्या देखील वाढल्याचे दिसून आले आहे. ज्या लोकांनी कोरोना झाल्यानंतर लस घेतली त्यांच्यात या समस्या वाढल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे.
लसीकरणाच्या एक वर्षानंतर लोकांवर याचा काय परिणाम झाला, हे जाणण्यासाठी बीएचयूच्या आरोग्य विज्ञान संस्थेने जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२३ मध्ये ६३५ तरुण आणि २९१ १८ वर्षांवरील लोकांवर अभ्यास केला. हा अहवाल मेडिकल जर्नल स्प्रिंगर लिंकमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
भारतात बनलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुष्परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये 304 तरुणांनी आणि 124 प्रौढांनी लस घेतल्यानंतर श्वसनमार्गाचा विषाणूजन्य संसर्ग झाल्याचे सांगितले. किशोरवयीन मुलांमध्ये सर्वात सामान्य प्रतिकूल परिणाम केस गळणे किंवा त्वचेचे विकार (10.5%), सामान्य विकार (10.2%) आणि मज्जासंस्थेचे विकार (4.7%) होते. तर, प्रौढांमध्ये सामान्य विकार (8.9%), मस्कुलोस्केलेटल विकार (5.8%) आणि मज्जासंस्थेचे विकार (5.5%) हे परिणाम जाणवले.
लस घेतल्यापासून सुमारे पाच टक्के महिलांनी मासिक पाळीत अनियमितता असल्याचे नोंदविले आहे. 2.7% महिलांनी नेत्रविकार जाणवत असल्याचे सांगितले.