Corona Vaccine : बापरे! 200 डोस आणि 1000 लोक, कोरोना लसीकरणासाठी चेंगराचेंगरी; नंबर मिळवण्यासाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:43 PM2021-07-02T14:43:50+5:302021-07-02T14:54:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरणासाठी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Corona Vaccine stampede like situation at vaccination centre in sausar chhindwara watch viral video | Corona Vaccine : बापरे! 200 डोस आणि 1000 लोक, कोरोना लसीकरणासाठी चेंगराचेंगरी; नंबर मिळवण्यासाठी लोकांची झुंबड

Corona Vaccine : बापरे! 200 डोस आणि 1000 लोक, कोरोना लसीकरणासाठी चेंगराचेंगरी; नंबर मिळवण्यासाठी लोकांची झुंबड

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,04,58,251 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,617 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,00,312 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर भागात लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. 

लसीकरणासाठी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना लसीसाठी लोकांनी धक्काबुक्की केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौसरच्या लोधी खेडा नावाच्या गावातही घडल्याचं दिसून आलं. लसीकरणासाठी पोहचलेल्या नागरिकांची गर्दी इतकी वाढली की  चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. केंद्रावर सकाळपासूनच मोठी गर्दी जमा झाली होती. केंद्राचं शटर बंद असल्यानं बाहेर नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. सीमित संख्येत लसीचे डोस केंद्रावर उपलब्ध असल्याने ठराविक संख्येलाच आत प्रवेश दिला जाणार होता. 

लसीकरण केंद्रावर 200 डोस आले होते आणि जवळपास एक हजारांहून अधिक लोकांनी कोरोना लसीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे केंद्राचं शटर उघडल्याबरोबर नंबर मिळवण्यासाठी आणि हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या गर्दीत अनेक महिला आणि वृद्धांचाही समावेश होता. पुढे जाण्याच्या प्रयत्नात नागरिक एकमेकांच्या अंगावरही पडले. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही फज्जा उडाला. लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. 

नागरिकांना टोकन वाटून आणि अतिरिक्त लसीच्या डोसची व्यवस्था करून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिल्हा लसीकरण अधिकारी एल एन साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सौसरमध्ये कोविशिल्ड लसीचे तीन हजार डोस पुरवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत सौसर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक फटका बसला होता. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांचा अधिरता वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भीषण, भयंकर, भयावह! जगभरात Delta व्हेरिएंटचा हाहाकार; भारत, अमेरिका, ब्रिटनसह 100 देशांमध्ये प्रसार

डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे.

Read in English

Web Title: Corona Vaccine stampede like situation at vaccination centre in sausar chhindwara watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.