नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये शेकडो नागरिकांनी लसीकरण केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, लसीसाठी झालेल्या या चेंगराचेंगरीत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धूपगुडी आरोग्य केंद्राचा मुख्य दरवाजा उघडताच बाहेर जमलेल्या लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.
कोरोना लसीकरण केंद्रावर तणावाची स्थिती निर्माण झाली. मारामारी करण्यात आली. यामध्ये अनेक महिला जखमी झाल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. स्थानिकांनी शेकडो लोक सकाळपासून लसीकरण केंद्रबाहेर रांगेत उभे असल्याचं म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्याचं म्हटलं आहे. चेंगराचेंगरी मागील कारण विचारलं असता अधिकाऱ्यांनी आम्ही या प्रकरणाचा तपास करत असल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर काही वेळासाठी लसीकरण थांबवण्यात आलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! डोळे आणि फुफ्फुसांनंतर आता कोरोना कानावर करतोय 'अटॅक'; ऐकण्याची क्षमता होतेय कमी
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना ब्लॅक फंगसचा देखील धोका आहे. तसेच संसर्गाचे हृदय, डोळे आणि फुफ्फुसांनंतर गंभीर परिणाम होत आहेत. यानंतर आता कोरोना कानावर अटॅक करत असल्याची धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. कान दुखणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कान जड होणे, घंटी किंवा शिटी वाजवल्यासारख्या आवाजाचा भास होणं अशा समस्या आता रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे रुग्णांना नीट झोप देखील लागत नाही. डॉक्टरांच्या मते हा कोरोनाचा नवा स्ट्रेन ड़ेल्टा व्हेरिएंट असू शकतो. रुग्णांमध्ये सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस पाहायला मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे हा त्रास होतो. कोरोना व्हायरस नाकाच्या माध्यमातून इम्यून सिस्टमवर अटॅक करतो. नाक आणि कान हे कनेक्टेड असतात. जे इन्फेक्शन नाकात असतं ते पुढे कानात जातं. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनने रिएक्शन होतं. कान डॅमेज होऊ शकतो.