नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5,784 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 252 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही काही लोकांच्या मनात लसीबाबत भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे
एका महिलेने कोरोना लसीचा धसका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोना लस पाहताच ती घाबरली आणि मोठमोठ्य़ाने ओरडायलाच लागली आणि घरातून पळाली. बिहारच्या जमुई जिल्ह्यातही ही घटना घडली. जिल्ह्यातील सिकंदरा परिसरातील लछुआड गावातील एक महिला लसीच्या भीतीने घरातून पळून थेट शेतामध्ये गेली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाची टीम गावोगावी जात लोकांना लस घेण्यास सांगत आहे.
लसीकरण पथक आल्याचं समजताच महिला पळत सुटली
गुरुवारी जेव्हा जिल्हा प्रशासनाची टीम एका महिलेच्या घरी गेली. यानंतर ही महिला पळून थेट शेतात गेली. गर्दीतून तिला कोणाचातरी आवाज आला की लसीकरण करण्यासाठी लोक आले आहेत, बाहेर या. हे ऐकताच महिलेला वाटलं की आता आपण वाचणार नाही आणि लस देणारे लोक आपल्याला पकडतील. यामुळे महिला घरातून पळ काढत शेतात पोहोचली. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेतात जात महिलेला चार-पाच लोकांच्या मदतीने पकडून अखेर लस दिली आहे. सरिता देवी असं महिलेचं नाव आहे.
गावात झाला हाय व्होल्टेज ड्रामा, Video व्हायरल
लस दिली जात असताना ही महिला मोठमोठ्याने ओरडू आणि रडू लागली. कोरोना लसीला घाबरून शेतात पळालेली महिला आणि शेतातच महिलेला पकडून लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आरोग्य जिल्हा आरोग्य व्यवस्थापक सुधांशू कुमार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितले. मात्र याचा तपास सुरू असून कोरोना लसीबाबत जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.