नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचा आकडा 3,00,82,778 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,069 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,91,981 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) बनावट लसीकरणाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्वत: IAS अधिकारी असल्याचं सांगून या व्यक्तीने चक्रवर्ती य़ांना बनावट लस दिली आहे.
टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एका लसीकरण शिबिरासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी सांगण्यात आलं होतं की, कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जॉईंट कमिश्नरच्यावतीने ट्रान्सजेंडर आणि अपंगांसाठी मोफत लसीकरण शिबीर (Corona Vaccine) आयोजित करण्यात आलं आहे. आयएएस अधिकारी असल्याचं सांगून त्या व्यक्तीने मला कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मी तेथे गेले आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी लसीकरण केलं."
"कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर जेव्हा मला कोणताही मेसेज आला नाही, तेव्हा मी लसीकरण प्रमाणपत्राबाबत विचारलं. तीन-चार दिवसांत ते मिळेल असं त्यावेळी मला सांगण्यात आलं. तेव्हा मला थोडी शंका आली, यानंतर मी लसीकरण थांबवलं आणि पोलिसांना देखील याबाबत सूचना दिली" असं मिमी चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. कोलकाता साऊथ डिव्हिजनचे डीसी राशिद मुनीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणात आरोपी देबांजन देब याला अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितलं की, लसीच्या डोसची खरेदी आरोग्य भवनाबाहेर आणि बागरी बाजारात केली. तरी या लसी तपासासाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यातून नेमका प्रकार लक्षात येईल. देबांजन देबने स्वत: आयएएस असल्याचा दावा केला होता आणि मिमी चक्रवर्ती यांना शिबिरात आमंत्रित केलं होतं." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! कोरोना लस न घेतल्यास बंद होणार सिमकार्ड; 'या' देशाने घेतला महत्त्वाचा निर्णय
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. तर काही ठिकाणी अद्यापही कोरोना लसीबद्दल लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लसीबाबत नागरिकांच्या मनातील संकोच दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने अनोखं पाऊल उचललं आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन राशिद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट हे शक्य तितक्या लोकांचं लसीकरण करणं हा आहे. "राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य विभागाचा संकलित अहवाल पंजाब प्रांतात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्या 3 ते 4 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. पाकिस्तानमध्ये 2 फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे" असंही म्हटलं आहे.