भोपाळ :मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. पीपल्स वैद्यकीय महाविद्यालयात डिसेंबर महिन्यात कोव्हॅक्सिनची ट्रायल झाली होती.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची ट्रायल ७ जानेवारी २०२१ रोजी पूर्ण झाली. यात संपूर्ण देशभरातील २६ हजार व्यक्तींना ट्रायल डोस देण्यात आला. १२ डिसेंबर २०२० रोजी भोपाळमधील पीपल्स वैद्यकीय महाविद्यालयात कोव्हॅक्सिन लसीचा ट्रायल डोस देण्यात आला. यावेळी दीपक मरावी नामक व्यक्तीने ट्रायल डोस घेतला होता. यानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी दीपक यांचा मृत्यू झाला. दीपक यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कोव्हॅक्सिनच्या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कोव्हॅक्सीनचा पहिला डोस दिल्यानंतर १९ डिसेंबर २०२० रोजी अचानक दीपक यांच्या तब्येत खालावली. यानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला. दीपक यांचा मुलगा आकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिनची लस घेतल्यानंतर वडिलांनी कामावर जाणे बंद केले होते. कोरोना प्रोटोकॉलचे योग्य पद्धतीने पालन करत होते. कोरोना लसीचा ट्रायल डोस घेतल्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि २१ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी ते घरात एकटेच होते. आई कामानिमित्त बाहेर गेली होती आणि धाकटा भाऊ खेळत होता. वडिलांच्या मृत्यूची सूचना पीपल्स वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आली, असे आकाश यांनी सांगितले.
दुसऱ्या डोससाठी आला फोन!
पीपल्स वैद्यकीय महाविद्यालातील पथकाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या डोससाठी दीपक यांना फोन केला. हा फोन आकाश यांनी उचलला. दीपक यांचा मृत्यू झाल्याची माहिती आकाश यांनी पुन्हा एकदा संबंधित पथकाला दिली. यानंतर एक्सिक्युटिव्ह यांना फोन कट केला, असे आकाश यांनी सांगितले.
दरम्यान, २२ डिसेंबर २०२० रोजी दीपक यांचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रारंभिक अहवालात दीपक यांच्या शरीरात विष आढळल्याची माहिती मिळाली आहे. दीपक यांचा मृत्यू कोरोना लसीच्या ट्रायल डोसमुळे झाला की, अन्य कारणांमुळे झाला, याबाबत विस्तृत अहवाल आल्यावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.