जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मॉडर्नाच्या (Moderna) कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मॉडर्ना लसीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
अमेरिकेच्या या लस निर्मात्या कंपनीशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत एस्ट्राजेनेका, फायझर-बायोनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन लसींचा आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत चीनच्या सिनोफार्मा आणि सिनोवाक लसींना देखील अशीच परवानगी दिली जाऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीफन बॅन्सेल यांनी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास ग्रीन सिग्नल दिला आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोठा दिलासा! ब्रिटनकडून भारतात येणार 'ऑक्सिजन फॅक्टरी'; एक मिनिटात तयार होणार 500 लीटर ऑक्सिजन
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान भारताला जगातील इतर देशांनी मदतीचा हात दिला आहे. ब्रिटनकडूनही भारताला वैद्यकीय उपकरणे, सामग्री पाठवण्यात येत आहे. ब्रिटनकडून भारताला ऑक्सिजन फॅक्टरी पाठवण्यात येणार आहे. यामुळे प्रति मिनिटाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करता येणे शक्य होणार आहे. उत्तर आयर्लंडमधून हे तीन 'ऑक्सिजन उत्पादक' पाठवण्यात येणार आहे. प्रति मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजन निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी 50 जणांना ऑक्सिजन देता येणे शक्य होणार आहे. एका शिपिंग कंटेनरच्या आकारातील छोटे ऑक्सिजन कारखाने भारतातील रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मागणीला काही प्रमाणात पूर्ण करू शकतील.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून उपाययोजना केल्या जात आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे दृष्य आम्ही पाहिले आहे. कोणीही ती परिस्थिती पाहिली तर त्यांना दु:खच होईल. कोरोनासारखं महाभयंकर संकट अजूनही संपलेलं नाही. हेच संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनकडून भारताला 495 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, 120 नॉन-इनव्हेजिव व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्यूअल व्हेंटिलेटर पाठवण्यात आले आहेत.