नवी दिल्ली - भारताच्या औषध महानियंत्रकांनी सहा ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. भारय बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस या वयोगटातील मुलांना देता येणार आहे. जाणून घेऊ याविषयी...
कोरोना लसींची मुबलकता वाढली कोरोनावरील लसींची निर्मिती भारतामध्ये टप्प्याटप्प्यांत सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक इत्यादींचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात प्रौढांना लसीच्या मात्रा दिल्या गेल्या. लसींचे प्रमाणही वाढले. यंदाच्या जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील तर मार्चमध्ये १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले.
लहानांसाठी लस महत्त्वाची का?कोरोनावरील लस अनेक गंभीर कोरोनापासून बचाव तर करतेच शिवाय कोरोनाची बाधा झालीच तरी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. कोरोना निर्बंध सैल झाल्याने अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळांमध्ये परतले. या पार्श्वभूमीवर त्यांचे लसीकरण महत्त्वाचे ठरते. अमेरिकेतही सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) पाच वर्षावरील मुलांच्या लसीकरणाचा सल्ला दिला आहे.५ ते १२ वयोगटातील मुलांना संसर्ग पटकन होतो, असे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे. कोरोना संसर्गापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
लसींचा बहुपर्याय उपलब्ध असेल?
१२ ते १४ या वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्स या लसीची शिफारस करण्यात आली आहे. १५ ते १८ वयोगटासाठी केवळ कोव्हॅक्सिन घेण्याच्या सूचना आहेत. ६ ते १२ वयागोटातील मुलांनाही कोव्हॅक्सिनचा पर्याय देण्यात आला आहे. या सर्व लसी सुरक्षित आणि परिणामकारक आहेत.