नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,30,27,621 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,948 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,40,752 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हरियाणाच्या एका गावातील 46 वर्षीय महिलेने कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर अचानक महिलेची प्रकृती बिघडू लागली. यानंतर आता 11 दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोग्य विभागाने कुटुंबीयांनी केलेले गंभीर आरोप नाकारले असून कोरोना लस घेतल्याने मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे. महिलेची कोरोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे.
महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, मांडी खुर्दा या गावात 24 ऑगस्ट रोजी उषा यांनी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर महिलेला ताप येऊ लागला. उषा यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याचं त्यांच्या पतीने म्हटलं आहे. त्यांनी अनेकदा यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पण उषा यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. अशातच शनिवारी त्यांची प्रकृती आणखीच ढासळली. उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उषा याआधी कधीच आजारी नव्हत्या. लस घेतल्याने त्या आजारी पडल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच वृद्धाचा मृत्यू; रांग सोडून लोकांनी ठोकली धूम
उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूची माहिती मिळताच लसीसाठी रांगेत उभे असलेले लोक घाबरले आणि रांग सोडून घरी पळून गेले. महाराजगंजमधील लसीकरण केंद्रावर ही घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.