नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी जगातील सर्व देशांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. ३ हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. फेसबुक, ट्विटर आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सूचना केली आहे.
कर्नाटक सरकारने कर्मचार्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्नाटक सरकारने बेंगळूरमधील सर्व कंपन्यांना सूचना केली आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये आजाराची लक्षणे आढळली तर त्याला घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच लोकांना स्वच्छता ठेवण्यास सांगितले जात आहे कर्नाटक सरकारने यासाठी परिपत्रक जारी केला आहे.
चीनच्या वुहान शहरापासून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली, सध्या हा व्हायरस अमेरिका, युरोप, भारत, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांत पसरला आहे. कोरोना व्हायरस संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे जास्त लोकांच्या संपर्कात येण्यापासून वाचण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी हा उपाय शोधला आहे. त्याचसोबत गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि सिस्को यांनीही आपल्या सुविधा काही दिवस मोफत देण्याची घोषणा केली आहे.
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी मंगळवारी जाहीर केले की जगभरातील सर्व G Suite ग्राहकांसाठी कंपनी हँगआउट मीट व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सेवा विनामुल्य देईल. येत्या आठवडाभरापासून ते १ जुलैपर्यंत ही मोफत सेवा सुरु होईल. पोस्टनुसार, गुगल हँगआउट मीटिंगच्या माध्यमातून कर्मचारी घरातूनच मिटिंगसाठी उपस्थित राहू शकतील. एकाच कॉलमध्ये 250 कर्मचारी या मिटिंगमध्ये सहभागी होऊ शकेल. या व्यतिरिक्त एका डोमेनमध्ये 100,000 प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रिमिंग केली जाऊ शकते. या मिटिंग रेकॉर्ड होतील आणि गूगल ड्रायव्हला सेव्ह केल्या जाऊ शकतात.
गुगलप्रमाणेच मायक्रोसॉफ्टनेही आपल्या टीम्स प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाला सहा महिन्यांसाठी विनामूल्य सेवा देण्याची घोषणा केली आहे. सिस्कोनेही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग साधन Webex विनामूल्य सेवा जाहीर केली आहे. ही सुविधा सिस्कोचे प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या सर्व देशात लागू होणार आहे. सिस्को, गूगल आणि मायक्रोसॉफ्टने दिलेली ही विनामूल्य सेवा लोकांना या कठीण काळात घरातून काम करण्यास मदत करेल अशी अपेक्षा कंपन्यांनी व्यक्त केली आहे.