वाराणसी : देशामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. कोरोनावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षणासाठी पीपीई किटची मोठी गरज भासू लागली आहे. यासाठी आता बनारसी साडी बनविणाऱ्या हातांनी पुढाकार घेतला आहे. वाराणसीमध्ये आता 7 प्रकारचे पीपीई किट बनणार आहेत.
वैद्यकीय उपकरणे, साहित्यांसाठी आपल्याला चीनवरच अवलंबून रहावे लागत होते. यामुळे भारतातच हे किट बनविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. वाराणसीमध्ये डीआरडीओने पीपीई किट बनविण्यासाठी एका फॅक्टरीला मंजुरी दिली आहे. या फॅक्टरीमध्ये सात प्रकारची किट बनविण्यात आली होती. या सातही किटना डीआरडीओने निवडले असून बनविण्याची मंजुरीही दिली आहे.
देशात बनारसी साड्य़ा खूप प्रसिद्ध आहेत. या साड्य़ा बनविणाऱ्या कारागिरांनीच हे किट बनविले आहेत. या कारागिरांच्या पिढ्यानपिढ्या साड्या बनविण्याच्या व्यवसायात होत्या. डीआरडीओ आणि शिप्राद्वारा मान्यता मिळाल्यानंतर या कारागिरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. खरेतर वाराणसी इंडस्ट्रीचे सहआयुक्त उमेशकुमार सिंह यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. या कारखान्यामध्ये महिन्याला 5 हजार किट बनविले जाणार आहेत. काही काळाने याची क्षमता वाढविली जाणार आहे. पीपीई किट हे उपचार करताना वापरले जात असल्याने याच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे सिंह यांनी सांगितले. या किटचे वाटप उत्तरप्रदेशच्या पूर्व भागात केले जाणार आहे.
किंमत फक्त 500 रुपयेदेशाच्या संकटकाळात पीपीई किट बनविण्यासाठी फॅक्टरी उभारणारे मालक गोविंद अग्रवाल यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी मनात विचार आला होता. जसे आम्ही साडी आणि सूट बनवितो तसेच पीपीई किट बनविता येऊ शकते. यासाठी सरकारची मदत घेण्याचे आम्ही ठरविले. यानंतर ही प्रक्रिया पुढे नेण्यात आली. डीआरडीओला आम्ही सात सॅम्पल पाठविले होते. महत्वाचे म्हणजे सातही सॅम्पलना मंजूरी मिळाली. यानंतर शिप्राला हे सॅम्पल पाठविण्यात आले. या प्रक्रियेत काही वेळ गेला. मात्र, शिप्राकडूनही होकार आला आणि आम्ही कामाला लागलो. रोज 200 ते 300 पीपीई किट बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. भविष्यात ही संख्या वाढविण्यात येणार आहे. या पीपीई किटची किंमतही हजारांमध्ये नसून ५०० रुपयांपेक्षा कमी ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
पुनर्वापर शक्यया बनारसी बनावटीच्या पीपीई किटचा पूनर्वापर शक्य आहे. वाराणसी आणि चंदौली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यांना हे किट आवडले आहे. हे काम करून आम्हाला आनंद मिळत आहे. देशाच्या कोरोना योद्ध्यांना ज्या समस्या येत होत्या त्या सोडविण्यासाठी आमची मदत झाली, असे अग्रवाल यांनी सांगितले.
(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे. मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)