लखनौ - योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. आपल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी काही धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. मात्र, युपी सरकारने कोरोना परिस्थिती चांगलीच हाताळल्याचा दावा सरकारने केला आहे. आता, उत्तर प्रदेश सरकारने कोरोना पॉझिटीव्ह आढळून येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना 1 महिन्याच कॅजव्हल लीव (पगार रजा) मंजूर करण्यात येत आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्यांची पगार रजा आणि कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना 21 दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय योगी सरकारने जाहीर केला आहे. कंटोनमेंट झोन जाहीर करण्यात आलेल्या भागातून येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यासही 21 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. जर एखाद्या कोविड पॉझिटीव्ह कर्मचाऱ्यास 1 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सुट्टी हवी असल्यास, नोंदणीकृत एलोपॅथी डॉक्टरकडून प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. कोरोनाशिवाय इतरही गंभीर आजारांसाठी ही सुट्टी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला पाहता राजधानी लखनौसहित एनसीआरलगतचे जिल्हे, गौतमनगर, गाझियाबाद, हापूड, बुलंदशहर, बागपत या शहरांत मास्क बंधनकारक केला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. दरम्यान, सोमवारी युपीमध्ये 115 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.