पाटणा - बिहारमध्ये कोरोना रुग्ण संख्या प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यामुळे आता राज्य सरकारने रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदिरेही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सिनेमागृहांनाही टाळे लावण्यात आले आहेत.
नव्या आदेशांनुसार, बिहारमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. सध्या 6 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान नाईट कर्फ्यू लागू असेल. याशिवाय अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सिनेमा हॉल, जिम, पार्क, क्लब, स्टेडियम आणि स्विमिंग पूल पूर्णपणे बंद राहतील.
रेस्टॉरंट ढाबा 50 टक्के क्षमतेने उघडू शकतील. विवाह सोहळ्याला जास्तीत जास्त 50 व्यक्ती आणि अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त 20 व्यक्ती उपस्थित राहू शकतील, असेही सांगण्यात आले आहे. याच बरोबर, सर्व राजकीय आणि सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी असेल. इयत्ता 9-12 चे वर्ग आणि महाविद्यालये 50% उपस्थितीसह खुले होतील, तर प्राथमिक ते आठवीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन चालतील.
याशिवाय, सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयेही ५०% उपस्थितीने उघडतील. या बंधनांमागील कारण म्हणजे, बिहारमध्ये एका दिवसात कोरोनाचे ८९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राजधानी पाटण्यात सर्वाधिक 565 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, नितीश कुमार यांनी सामाजिक सुधारणा अभियान दौरा आणि त्यांचा साप्ताहिक जनता दरबार कार्यक्रम 21 जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्याचीही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.