नवी दिल्ली - जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. हा व्हायरस रोज शेकडो लोकांचे बळी घेत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातारण आहे. अशा परिस्थितीत, हा व्हायरस शरीराच्या नेमक्या कोणकोणत्या अवयवांसाठी घातक आहे अथवा शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करू शकतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर दिले आहे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे डॉक्टर नरेश गुप्ता यांनी. हा व्हायरस श्वासोच्छ्वास माध्यमाने शरीरात प्रवेश करतो आणि एक, दोन नव्हे, तर तब्बल चार अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करतो, असे गुप्ता यांनी सांगितले.
'या' चार अवयवांवर करतो प्रामुख्याने हल्ला -डॉ. गुप्ता म्हणाले, कोरोना व्हायरस शरीरात गेला, की तो प्रामुख्याने फुफ्फुस, श्वसन प्रणाली, मूत्रपिंड (किडनी) आणि आतडे यांना हानी पोहोचवतो. यापूर्वी, हा व्हायरस मुत्रपिंडालाही हानी पोहोचवतो, असे जर्मनीच्या एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले होते. तेही खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र या व्हायरसमुळे फुफ्फुसाला जेवढी हानी पोहोचते तेवढी मुत्रपिंड अथवा आतड्यांना पोहोचत नाही, असेही त्यांनी सांगितले. ते ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते.
हा व्हायरस मानवाच्या शरीरात गेल्यानंतर सर्वप्रथम फुफ्फुसावर हल्ला करतो. याच्या प्रवेशानंतर फुफ्फुसात सूज येते आणि न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात. याशिवाय तो शरीराच्या इतर भागांतही जाऊ शकतो. जसे, आतडे, मुत्रपिंड इत्यादी. फुफ्फुसावर याचा हल्ला सर्वप्रथम होतो आणि तो येथेच सर्वाधिक नुकसान करतो. यामुळेच रुग्णाला ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरची आवश्यकता भासते.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आतापर्यंत 3 लाख 2 हजार 956 नमुने तपासले आहेत. देशातील सरकारी आणि खासगी तपासणी केंद्रांवर काल 27 हजार 256 नमुने तपासण्यात आले आहेत. डिसेंबर 2019मध्ये चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधूल या व्हायरसचा जन्म झाला. आज त्यांने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे.