Corona Virus Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यानं राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. पण आता इतर राज्यांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रानंतर आता इतर राज्यांमध्येही कोरोना भयंकर रुप धारण करत असल्याचं नव्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. (corona virus cases in india lockdown night curfew delhi lucknow maharashtra up bihar updates)
देशात सोमवारी १ कोटी ६० लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १२ लाखांच्या वर पोहोचली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असले तरी आता दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास केंद्र सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात लॉकडाऊनची शक्यता, कोरोनाची गंभीर परिस्थिती; राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊवर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. एकट्या लखनऊमध्ये दिवसागणिक ४ हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवरही ताण वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स अपुरे पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
दुसरीकडे उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसातील रुग्ण वाढीचा उत्तर प्रदेशचा हा सर्वाधिक आकडा नोंदवला गेला आहे. तसंच गेल्या २४ तासांत राज्यात ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे.
अमरावती पॅटर्न वापरणार, ठाकरे सरकार कोरोनाला रोखणार; नेमका काय आहे हा पॅटर्न जाणून घ्या...
देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसतंय. दिल्लीत सोमवारी ११ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळलेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतही नाइट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यासोबत इतरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजारापेक्षा जास्त झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता पडत आहे. यामुळेच दिल्ली सरकारनं १४ खासगी रुग्णालयांना पूर्णत: कोविड रुग्णांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचं संकट असतानाही कुंभ मेळ्याचं आयोजन केल्याच्या मुद्द्यावर उत्तराखंड सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. उत्तराखंडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. उत्तराखंडमध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये तर लॉकडाऊन जाहीर देखील करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात गेल्या २४ तासांत ६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भोपाळमध्ये १९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर संपूर्ण राज्यात याआधीच नाइट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय छिंदवाडा, ग्वालियार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
गुजरातच्या अहमदाबादमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात तर कोरोना रुग्णांचे बेड्स उपलब्ध नसल्यानं हाल होत आहेत. या रुग्णालयात सध्या १२०० बेड्स रुग्णांनी भरले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयाबाहेर अॅम्ब्युलन्समध्येच ठेवण्याची वेळ आली आहे. अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना ऑक्सिजन देण्याची वेळ ओढावली आहे.
देशातील कोरोनाची परिस्थितीएकूण रुग्ण: 1,36,89,453 बरे झालेले रुग्ण: 1,22,53,697 देशात सध्या सक्रिय रुग्ण: 12,64,698 आतापर्यंत झालेले मृत्यू: 1,71,058आतापर्यंत झालेलं लसीकरणाचे एकूण डोस: 10,85,33,085