Corona Virus : केरळमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; नव्या सबव्हेरिएंटचा मोठा धोका, रुग्णांमध्ये वेगाने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:50 AM2023-12-18T10:50:09+5:302023-12-18T11:02:37+5:30
Corona Virus : देशात आतापर्यंत 4 कोटी 50 लाख 4 हजार 816 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4.46 कोटी झाली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसच्या नवीन सबव्हेरिएंटचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच दरम्यान, भारतात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भारतात कोरोनाचे 335 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्ण आढळल्यानंतर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,701 वर पोहोचली आहे. याशिवाय रविवारी पाच कोरोना बाधित लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी चार मृत्यू फक्त केरळमध्ये झाले, जिथे कोरोनाचा नवीन सबव्हेरिएंट JN.1 आढळला.
देशात आतापर्यंत 4 कोटी 50 लाख 4 हजार 816 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4.46 कोटी (4,44,69,799) झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, नॅशनल रिकव्हरी रेट 98.81 टक्के आहे. भारतात कोविड-19 मुळे आतापर्यंत 5,33,316 लोकांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.
भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या नियमित निरीक्षण एक्टिविटीचा एक भाग म्हणून केरळमधील 79 वर्षीय महिलेमध्ये कोरोना सब-व्हेरिएंट JN.1 आढळला आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) शनिवारी (16 डिसेंबर) माहिती दिली. ICMRचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी सांगितलं की, 8 डिसेंबर रोजी दक्षिणेकडील राज्याच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह नमुन्यात हे प्रकरण आढळून आलं.
ते म्हणाले की, 18 नोव्हेंबर रोजी नमुना आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह आढळला. महिलेमध्ये इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती. रविवारी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, राज्यात आढळलेला कोरोना सबव्हेरिएंट JN.1 ही चिंतेची बाब नाही. नवीन व्हेरिएंटबद्दल मीडियाशी बोलताना जॉर्ज म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर चाचणीदरम्यान एका भारतीय प्रवाशामध्ये कोरोनाचा नवीन सबव्हेरिएंट आढळून आला होता.
कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही, हा सबव्हेरिएंट आहे. हा नुकताच येथे सापडला आहे. काळजी करण्याची गरज नाही. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं आणि ज्यांना इतर गंभीर आजार आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी असंही म्हटलं आहे.