नवी दिल्ली : पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणे आवश्यक नाही, असे देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने (डीजीएचएस)ने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या १८ वर्षे वयाखालील मुलांना रेमडेसिविर औषध देऊ नये, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
संचालनालयाने सांगितले की, सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांनी पालक व डॉक्टर यांच्या देखरेखीखाली मास्क वापरण्यास हरकत नाही. १८ वर्षे वयाखालील मुलांमध्ये कोरोनाचा होणारा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स देणे हे हानीकारक ठरू शकते. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या, कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या तसेच प्रकृती गंभीर असलेल्यांवरच स्टिरॉईड्सचा वापर केला जावा.
वापर योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य कालावधीसाठी करण्यात यावा, असे या आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटले आहे. रुग्णाची प्रकृती पाहून त्याची एचआरसीटी करावी किंवा न करावी याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घ्यावा असेही या नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.
इंजेक्शन सुरक्षित आहे का?नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, १८ वर्षे वयाखालील कोरोनाग्रस्त मुलांच्या उपचारांत रेमडेसिविरचा वापर करू नये. कारण मुलांवर उपचार करताना रेमडेसिविर परिणामकारक ठरते का किंवा त्या मुलांसाठी हे औषध किती सुरक्षित आहे याबद्दल अद्याप पुरेसा अभ्यास झालेला नाही.