रांची : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. यातच झारखंडमध्ये तब्बल 50 चीनी इंजिनियर असल्याने येथे भीतीचे वातावरण आहे. हे इंजिनियर्स गोड्डातील मोतिया येथील निर्माणाधीन अदानी पावर प्लांटमध्ये कार्यरत आहेत.
या इंजिनियर्सची बुधवारी तपासणी करण्यात आली. या चाचणीत त्यांच्यात कोरोनाची कसल्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाहीत. या सर्वांना 26 दिवसांपर्यंत डॉक्टरांच्या निगराणीत हाऊस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.
झारखंडच्या विधानसभेत बजेट सत्रादरम्यान मंगळवारी आमदार प्रदीप यादव यांनी, 'गोड्डा येथील अदानी कंपनीचा एक पावर प्लांट तयार होत आहे. येथे 50 हून अधिक चीनी इंजिनियर्स कार्यरत आहेत. यांतील काही इंजिनियर्स जानेवारी महिन्यात आपल्या देशात जाऊन आले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या चीनी नागरिकांची तपासणी ह्वायला हवी,' अशी मागणी केली होती.
यासंदर्भात गोड्डा येथील सिव्हिल सर्जन डॉ. एसपी मिश्रा यांनी सांगितले, की कोरोना व्हायरसची लागण झालेले अद्याप सापडलेले नाहीत. मात्र, असे असले तरीही सतर्कता म्हणून उपाय योजना करण्यात आली आहे.
झारखंडमध्ये आजपर्यंत 36 जणांची तपासणी झाली असून, 23 जणांचे रिपोर्ट आले आहेत. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आतापर्यंत झारखंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार परदेशातून झारखंडमध्ये आलेले 263 जणांवर बारीक लक्ष आहे. यापैकी 100 जण प्रोटोकॉलप्रमाणे 28 दिवसांपर्यंत निगराणीत होते. तर उर्वरित लोकांना 28 दिवस पूर्ण होईपर्यंत घरातच एकांत वासात राहण्यास सांगण्यात आले आहे.
विविध राज्यांत कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे देशात विषाणूचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या बुधवारी 169 वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री तेलंगणामध्ये 7 जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका कोरोनाबाधिताने नवी दिल्लीत आत्महत्या केली आहे.
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखमधील एक भाग पूर्णपणे देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानंतर कारगिल सांकू आणि जवळपासची सर्व गावे विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अनेक कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे सॅम्पल्सदेखील तपासनीसाठी पाठवण्यात आले आहेत. लडाखमध्ये आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.