मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये, राज्यातील कोरोनाची विदारक परिस्थिती कथन केली. पंतप्रधाननरेंद्र मोदींकडे जीएसटी, ऑक्जिसन आणि मदतीसाठी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8.30 वाजता राज्यातील जनेतशी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील जनतेला सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर, राज्यातील कोरोना परिस्थितीची विदारक परिस्थिती कथन करत, राज्यात कोरोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचे सांगितले. आपण दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पण आपल्याला कोरोनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले.
राज्यातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे, त्यामुळे ऑक्सिजनची मोठी गरज महाराष्ट्राला आहे. राज्यात बेड, रेमडेसीव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे, पंतप्रधाननरेंद्र मोदींनी मी विनंती करत आहे. हवाई वाहतुकीने ऑक्सीजन आणण्यासाठी वायू दलाला आदेश देऊन आम्हाला मदत करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.