नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे सध्या जगासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. भारतालाही कोरोना विषाणूची संपूर्ण झळ मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाला दिशा दाखवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. कोरोनाला रोखण्यासाठीच्या प्रभावी उपाययोजना आणि कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशविदेशातील तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात राहुल गांधी यांनी अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला आहे.
राहुल गांधी आणि रघुराम राजन यांच्यात कोरोना विषाणू आणि त्यानंतर येणाऱ्या आर्थिक संकटावर उपाययोजना शोधण्यासाठी झालेल्या संवादाचे प्रक्षेपण काँग्रेसच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज सकाळी ९ वाजता झाले. काँग्रेस पक्षाने या आठवड्यात अशा प्रकारच्या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आखली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रसारमाध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये सुरजेवाला म्हणाले होते की, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत चालले आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी आणि रघुराम राजन यांच्यात झालेली चर्चा पाहा.
दरम्यान, सुरजेवाला यांनी या चर्चेचा काही भाग ट्विट केला होता. यामध्ये राहुल गांधी हे रघुराम राजन यांना प्रश्न विचारत आहेत. या चर्चेमध्ये रघुराम राजन हे कोरोना विषाणूच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या प्रभावाबाबत भाष्य करणार आहेत. तसेच या संकटाच्या काळात गरिबांना कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत चर्चा करतील.
तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पुढील आठवड्यात कोरोना विषाणूबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली.