बंगळुरू - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे. राजधानी मुंबईतील कोरोना रुग्णांचा दैनिक आकडा 15 हजारांच्यापुढे गेला आहे. त्यामुळे, सरकारकडून कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. महाराष्ट्रासह, दिल्ली, प.बंगाल आणि कर्नाटक राज्यातही कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. त्यात, रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमात गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच, कर्नाटकमधीलकाँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
डीके शिवकुमार हे पाण्याचा प्रश्न घेऊन मेकेदातू सर्व्हर प्रोजेक्टसाठी उद्या रविवारपासून तब्बल 168 किमीची पदयात्रा काढत आहेत. मात्र, सध्या राज्यात विकेंड संचारबंदी लागू करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. तरीही, डिके शिवकुमार यांनी पदयात्रेचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता. त्यावर, उत्तर देताना देशात कोरोना नाही, असे डीके शिवकुमार यांनी म्हटलंय.
देशात कोरोना नसून भाजपने हे वातावरण तयार केलंय. कुठंय कोरोना, कोरोना कुठेही नाही. पदयात्रेला थांबविण्यासाठी आणि लोकांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी सरकारनेच कोरोना रुग्णांच्या आकड्यात घोळ केला आहे. त्यातून ही परिस्थिती निर्माण केल्याचा गंभीर आरोप डिके. शिवकुमार यांनी केलाय. बंगळुरू शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील पाण्याच्या समस्येला या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर आणत आहोत. त्यामुळे, सत्ताधारी भाजपला भिती वाटत असल्याचंही शिवकुमार यांनी म्हटलं. संचारबंदी लादत भाजपकडून राजकारण खेळण्यात येत असल्याचंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्यांचही सरकारवर आरोप
"काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावं. ओमिक्रॉनचे ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरजच पडत नाहीये. २-४ दिवसांत सगळे बरे होत आहेत. खुप कमी लोक कोमॉर्बिटी आहे, त्यांनी काळजी घ्यायची गरज आहे. घाबरायची गरज नाही," असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
देशात दिवसभरात १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण
कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा भारतात दहशत पसरली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तिसरी लाट धडकण्याचे संकेत मिळत आहेत. मागील २४ तासांत कोरोनाचे १ लाख १७ हजार १०० रुग्ण आढळले. बुधवारच्या तुलनेत तब्बल २८ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बुधवारी देशात ९० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. भारतात जवळपास ७ महिन्यांनी रुग्णसंख्या १ लाखांच्या वर गेली आहे. त्याआधी ६ जूनला भारतात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते.