नवी दिल्ली : कोरोना विषाणूची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर तेथून विशेष विमानाने दिल्लीत आणलेल्या ६४0 पैकी एकाही भारतीयालाकोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे त्या विषाणूचा भारताला धोका कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या सर्वांना आणखी काही दिवस एकांतवासामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय होईल.
चीनच्या वुहानमध्ये व अन्य प्रांतांत कोरोना लागण होऊ न शेकडो लोक मरण पावले आहेत आणि २५ ते ३0 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. त्या विषाणुमुळे अनेक लोक मरण पावत असल्याने भारताने गेल्या आठवड्यात एअर इंडियाची विमाने पाठवून तेथून ६४0 भारतीयांना परत आणले. त्यात बहुतांशी विद्यार्थी आहेत.
दिल्लीत आणल्यानंतर त्यांना दिल्लीत व काहींना हरयाणामध्ये एकांतवासात ठेवले आहे. त्यांच्यापैकी कोणाला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याचा संसर्ग बाहेरील लोकांना होऊ नये, असा त्याचा हेतू होता. तसेच त्यांच्या विविध चाचण्याही घेण्यात यायच्या होत्या. त्या सर्वांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, ६४0 पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यापासून आता कोणाला धोका नाही. त्यांच्यापैकी काहींनी पुन्हा चीनला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मात्र त्यांना किमान दोन महिने चीनला पाठवले जाणार नाही.केरळमध्ये मात्र तीन कोरोनाचे रुग्ण आहेत. तसेच तिथे कित्येक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ते तिघेही विद्यार्थी आहेत. दिल्ली व हरयाणामध्ये दूर ठेवलेल्यांमध्ये अनेक मराठी विद्यार्थीही आहेत.
भारतीय महिला हॉकी संघाचा चीन दौरा रद्द
कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे भारतीय महिला हॉकी संघाला प्रस्तावित चीन दौरा रद्द करावा लागला आहे. यामुळे हॉकी इंडियापुढे ऑलिम्पिकच्या तयारीचे कठीण आव्हान उभे झाले. भारतीय संघाला १४ ते २५ मार्च या काळात चीनला जायचे होते. मात्र दौरा करावा लागला. भारताची कर्णधार राणी रामपाल म्हणाली की, हा दौरा महत्त्वपूर्ण होता. प्रो हॉकी लीगमुळे दौऱ्यासाठी अन्य देश उपलब्ध नाहीत. तयारीसाठी बलाढ्य संघांविरुद्ध खेळणे आवश्यक असल्याने पर्यायाचा शोध सुरू आहे.