नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव जपानसह अन्य काही देशांपर्यंत पोहोचल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या आधीच्या लाटांचाचा पूर्वानुभव लक्षात घेऊन खबरदारीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, चीन आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत असताना काल दिवसभरामध्ये भारतात कोरोनाचे १८५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची ३ हजार ४०२ एवढी आहे. जगभरात कोरोनाच्या वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
गेल्या २४ तासांत सापडलेल्या १८५ रुग्णांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ कोटी, ४६ लाख, ७६ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४०२ एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ३० हजार ६८१ वर पोहोचली आहे.
भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ०.०१ टक्के आहे. गेल्या २४ तासंमध्ये उपचाराधीन रुग्णांची सहाने कमी झाली आहे. या आकडेवारीनुसार भारतामध्ये बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांची टक्केवारी ही ९८.८० एवढी आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी, ४१ लाख, ४२ हजार ४३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची टक्केवारी ही १.१९ टक्के आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात लसीकरण अभियानामधून आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे २२०.०३ डोस देण्यात आले आहेत. भारतात १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर पोहोचली आहे. तर ४ मे २०२१ रोजी ही रुग्णसंख्या दोन कोटींवर पोहोचली होती. २३ जून २०२१ रोजी या रुग्णसंख्येने ३ कोटींचा आकडा ओलांडला होता. तर २५ जानेवारी २०२२ रोजी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींवर पोहोचली होती.