पुणे : कोरोनावरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या भारतात सुरु झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ऑगस्टमध्ये घेतली जाईल. भारतीय बनावटीची लस आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील लस यांची तुलना करुन अंतिम चाचणी घेतली जाईल. डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस प्रत्यक्षात उपलब्ध होईल अशी आशा करायला हरकत नाही,असा दिलासा ‘सीरम’इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी मंगळवारी (दि. २१) दिला.
कोविड-१९ या विषाणूवरील प्रतिबंधात्मक लस विकसित करण्यासाठी ‘सीरम’ने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत करार केला आहे. वेगवेगळ्या पाच ठिकाणी लस विकसित करण्याचे काम चालू आहे. यात इंग्लंडमधले ऑक्सफर्ड विद्यापीठ संशोधनात सुरुवात आघाडीवर आहे, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले. या लसीचे भारतात उत्पादन घेण्याचे अधिकार ‘ऑक्सफोर्ड ’ने ‘सीरम’ला दिले आहेत. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरतर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुनावाला बोलत होते. सबिना संघवी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या राष्ट्रीय अध्यक्षा जानबी पुखन आणि पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांनी स्वागत केले.
पुनावाला म्हणाले, ऑक्सफर्डने यापूर्वी इबोला लसीवर काम केले आहे. कोरोनावरील लसीसाठी याच प्रकारची प्रक्रिया सुरू आहे. दुसºया क्रमांकावर युगोस्लाव्हियातील प्रकल्प आहे. पोलिओ लस तेथे विकसित झाली होती. या प्रकल्पाची क्षमता खूप मोठी आहे. तेथील लस विकसित होण्याचे काम दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यात यश मिळाल्यास ऑस्ट्रियातील प्रकल्पात या लसींचे उत्पादन होईल आणि त्या भारतात आणल्या जातील. त्यानंतर जगभरात त्यांचे वितरण होईल. अमेरिकेतील एका कंपनीसोबबत ' कोव्हिवॅक्स' लसीसंदर्भात करार झाला आहे. याशिवाय, सीरमने भारतीय संशोधकांच्या मदतीने 'कोव्हिवॅक्स लसीवर काम सुरू केले. ही लस पूर्णत: भारतीय बनावटीची असेल.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘बीसीजी’ची लस अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आपण लहानपणी एकदा ही लस घेतल्यावर पुन्हा घेत नाही. मात्र, आता दुसरा डोस घेतल्यावर त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून संसर्गाची लढण्याची ताकद मिळू शकते, असा दावा सायरस पूनावाला यांनी केला.
...........................................................................................
पाच बॅच इंटरनॅशनल कंट्रोल लॅबोरेटरीच्या मान्यतेसाठीकोरोनावरील लसीच्या पाच बॅच इंटरनॅशनल कंट्रोल लॅबोरेटरीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या चाचण्या झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल ऑगस्टमध्ये घेतली जाईल. भारतीय बनावटीची लस आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील लस यांची तुलना करून अंतिम चाचणी करण्यात येईल. डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस प्रत्यक्षात येईल, अशी आशा करायला हरकत नाही. पहिल्या डोसची चाचणी सप्टेंबरमध्ये आणि दुसऱ्या डोसची चाचणी ऑक्टोबरमध्ये केली जाईल. लसीची सुरक्षितता आणि दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
.....................................................................
सर्व प्रकल्प थांबवून २ अब्ज डोसचे उत्पादन कमी किमतीत लस सामान्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने हजार कोटी रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले. मात्र, ''सीरम'' ला कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही. सामान्यांना परवडेल अशा दरात लस उपलब्ध करून देण्याची सीरमची परंपरा आहे. ही लस केवळ भारतीयांसाठी नसेल, तर जगभरातील लोकांना त्याचा उपयोग होईल. लसींची आवश्यकता पाहता इतर काही प्रकल्प थांबवून सीरममध्ये २ अब्ज डोसचे उत्पादन केले जाईल.