देशभरात सध्या कोरोना झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 6,155 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, कोरोनाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर विकली पॉझिटिव्हिटी रेट 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मनसुख मांडविया यांनी कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोविड-19 लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करण्याची गरज आहे. या बैठकीतून एक विशेष गोष्ट समोर आली ती म्हणजे मास्क अद्याप अनिवार्य केले गेले नाहीत आणि राज्यांना कोविड चाचणी आणि जीनोम सीक्वेंसिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले गेले. या बैठकीत राज्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य केंद्रांवर मॉक ड्रिल घेण्यास सांगण्यात आले आहे. मॉक ड्रीलचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या वतीने राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना स्वत: रुग्णालयांना भेट देण्यास सांगण्यात आले.
देशाची राजधानी दिल्लीत आता कोरोना जीवघेणा ठरत आहे. दिल्ली सरकारचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात कोरोनाचे अनेक रुग्ण दाखल आहेत, या सर्वांना ऑक्सिजनची गरज आहे. यापैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. दिल्ली एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच उर्वरित 9 रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
डॉ. सुरेश सांगतात की, रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे, श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत आहे. या सर्वांना ऑक्सिजनशिवाय श्वास घेण्यास त्रास होतो. प्रत्येकाची ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी असते. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल असलेल्या या रुग्णांना ऑक्सिजनचा आधार दिला जात आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांना कोविड पॉझिटिव्ह असल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णालयात आणण्यात आले होते, दाखल केल्यानंतर त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी म्हटले. यावेळी कोविड रूग्णांमध्ये ताप आणि खोकल्याची लक्षणे दिसून येत आहेत, परंतु गंभीर रूग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"