नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसमुळे दहशत पसरली आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आतापर्यंत ६ हजारपेक्षा अधिक जणांचा जीव या आजाराने घेतला आहे. युरोपातील बहुतांश देशात हा रोग पसरला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०० च्या वर पोहचली आहे.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जागतिक महामारी म्हणून घोषित केला आहे. कोरोना व्हायरस चीनमध्ये पसरत असताना भारतात त्यावेळी काय सुरु होतं? याची आठवण केली तर सीएए कायद्याच्या विरोधावरुन ठिकठिकाणी निदर्शने सुरु होती. दिल्लीत दंगल घडली होती तर शाहीनबागेत मुस्लीम महिला आंदोलक धरणे आंदोलन करत होत्या. शाहीनबागेत आंदोलनकर्त्यांचा आज ९३ वा दिवस आहे. मात्र हळूहळू याठिकाणी जमणाऱ्या लोकांची गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.
शाहीनबागेत मागील ३ महिन्यापासून सीएए कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी २ ते ३ हजार लोक याठिकाणी मंडपात जमा होत असे. या आंदोलनावरुन देशभरात अन्य ठिकाणी अशाच प्रकारे आंदोलन सुरु करण्यात आलं. हिंदू संघटनांनी या आंदोलनकर्त्यांना धमक्याही दिल्या होत्या. दिल्लीतील दंगल पेटण्यामागे शाहीनबाग आंदोलनाचाही परिणाम होता. मात्र आता शाहीनबागेत लोक दिसत नाहीत. याठिकाणी महिला आंदोलक हजेरी लावतात पण त्यांची संख्या १०० च्या आत असते. शाहीनबागेत मास्क घालून आंदोलन केलं जातं.
ईशान्य दिल्लीत सीएएवरुन झालेल्या दंगलीत ५० पेक्षा अधिक जणांचा जीव गेला. दंगलीनंतर अजूनही पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. सीलमपूर, मौजपूर आणि ब्रह्मपुरी परिसरात शांतता दिसून येते. कोरोना व्हायरसच्या धसक्याने या परिसरातही अनेक कंपन्यांना टाळे लागल्याचं चित्र आहे. अनेकजण आपापल्या गावी निघून गेले आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र जमण्यास विरोध केला आहे. त्यामुळे सीएएविरोधात होणाऱ्या राजकीय सभाही बंद झाल्या आहेत. राजकीय सभा नसल्याने सरकार आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोपही बंद झालेत. चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक परिणाम इटलीवर झाला आहे. याठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९०० पर्यंत पोहचली आहे. युरोपात या आजाराने २००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कजाखस्तान, अमेरिका आणि स्पेन यादेशांनीही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे.