कोलकाता - देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता सर्वांनाच लागली आहे. महाराष्ट्रातही दैनंदीन कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या 3 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, इतर राज्यात अद्यापही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असून सरकारी कार्यालयात 50 टक्केच उपस्थिती ठेवण्याचे बजावले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 3 लाख कर्मचाऱ्यांपैकी 60 हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात गेल्या 7 दिवसांत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. प. बंगाल सरकारमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास 3 लाख कर्मचाऱ्यांपैकी 60 हजारांपेक्षा अधिक लोक कोविड 19 पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे नबन्ना येथे राज्य सचिवालयात काम करणाऱ्या 4000 कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, राज्य सरकारला काम करणं अवघड होऊन बसलंय. तसेच, मध्य कोलकाता येथील महारकर्णच्या 2000 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 700 कर्मचारी या व्हायरसने पीडित आहेत.
राज्य सरकारमधील 1/3 कर्मचारी कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यामुळे, अनेक प्रमुख कार्यालयात सफाई कर्मचारीही उपलब्ध नाहीत. म्हणून कार्यालय उघडणे आणि बंद करणेही जिकरीचे काम बनल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सरकारने वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे, पण काही कार्यालयात घरातून काम शक्य नसते. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकारी जास्त प्रमाणात बाधित झाल्याचंही सांगण्यात आलंय.