नवी दिल्ली - भारतातील कोरोना स्थितीत अद्यापही सुधारणा होताना दिसत नाही. केंद्री आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात तब्बल 4,01,993 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3523 जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2,11,853 लाखवर पोहोचली आहे. सध्या देशात 32,68,710 सक्रिय रुग्ण आहेत. (Corona Virus crisis in India, huge criticism of Prime Minister Modi in foreign media)
कोरोना व्हायरसपुढे देशातील आरोग्य व्यवस्था हतबल होत असल्याचे चित्र आहे. रुग्णालये आणि स्मशानांतही वेळेवर जागा मिळणे कठीण झाले आहे. पार्किंग एरियामध्येही मृतदेह जाळताना दिसत आहेत. सामूहिक अंत्यसंस्कारांचे फोटोही आंतरराष्ट्रीय माध्यमांत पसरताना दिसत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांत कोरोना संकटामुळे बिघडणाऱ्या परिस्थितीवरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांत भारतातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. कोरोना संकटाच्या काळात निवडणूक सभा आणि कुंभ मेळा आयोजन करण्याचा निर्णय चुकीचा होता, असे या माध्यमांत म्हणण्यात आले आहे. सर्वात नवे वृत्त अमेरिकेतील टाइम मॅक्झिनमध्ये “How Modi Failed Us” शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली आहे. ते भारतीय पत्रकार राणा अयूब यांनी लिहिले आहे. भारतातील मजबूत सरकारने गोष्टींकडे दूर्लक्ष केले, असेही यात म्हणण्यात आले आहे.
टाइम मॅक्झिनच्या वृत्तात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीत कमतरतेसाठी सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की पंतप्रधानांनी कुंभ मेळा 'सांकेतिक' पद्धतीने करा, असे आवाहन करण्यास उशीर केला. तसेच, उपचारांअभावी हजारो लोकांना जीव गमवावा लागला. मात्र, देशातील मोठे नेते निवडणूक प्रचारात व्यस्त होते.
Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल
द टाइम मॅक्झिनप्रमाणेच अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स आणि इग्लंडमधील न्यूजपेपर द गार्डियननेही वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने “As Covid 19 Devastates India, Deaths Go Undercounted” या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. जेव्हा कोरोनाने भारतात थैमान घातले होता, तेव्हा मृत्यूची संख्या कमी सांगितली जात होती. आकड्यात हेराफेरी केली जात आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे.
'द ऑस्ट्रेलियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की अहंकार, अती राष्ट्रवाद आणि नोकरशाहीच्या अयोग्यतेने भारतात कसे कोरोना संकट वाढले. यातच गर्दी आणि गर्दीत राहणे पसंत करणारे पंतप्रधान आपल्यातच व्यस्त राहिले आणि नागरिक गुदमरत राहिले. 'द ऑस्ट्रेलियन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तासंदर्भात कॅनबरा येथील भारतीय दुतावासाने तीव्र आक्षेपही व्यक्त केला होता.