दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा थेट दुप्पट झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणांच्या चिंता वाढल्या आहेत. दिल्लीत गेल्या २४ तासांत १००९ नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिल्लीत ६०१ रुग्ण सापडले होते. तर त्या आधीच्या दोन दिवसांत ५०० च्या आसपास रुग्ण सापडले होते.
जानेवारी ते मार्च दरम्यान दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 97 टक्के नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की मृतांच्या गोळा केलेल्या 578 नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये असे दिसून आले की त्यापैकी 560 मध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट होता. ओमायक्रॉन व्हेरिअंमुळे धोका नाही असे अनेक तज्ज्ञ तिसऱ्या लाटेवेळी सांगत होते. परंतू वास्तव त्याहून वेगळे आहे.
गेल्या काही दिवसांपासून अचानक दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. दिल्लीत संक्रमण दर हा 5.70% वर आला आहे, जो दोन दिवसांत ८ टक्क्यावर गेला होता. १० फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच दिल्लीत हजारावर रुग्ण सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे टेस्टिंगची संख्या वाढविण्यात आलेली नाही. बुधवारी दिल्लीत 17701 टेस्टिंग करण्यात आले आहे. यामध्ये 9581 आरटीपीसीआर चाचण्या आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या चाचण्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत.
बुधवारी दिल्लीमध्ये डीडीएमएच्या बैठकीत मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. मास्क न घातल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शाळा ऑफलाईन सुरु राहतील, परंतू कोरोना नियम काटेकोर पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.