नवी दिल्ली: दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक नियामक DGCA ने हवाई प्रवाशांना मास्क घालून प्रवास करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. DGCA ने बुधवारी निर्देश जारी केले, ज्यानुसार विमानात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे डीजीसीएने म्हटले आहे.
काय आहे DGCA चे निर्देशDGCA ने सर्व विमान कंपन्यांना प्रवासादरम्यान प्रवाशांकडून नियमांचे पालन करुन घेण्यास सांगितले आहे. तसेच विमानाची आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या प्रवाशाने नियमांचे पालन केले नाही, तर विमान कंपनी त्या प्रवाशाविरुद्ध कठोर कारवाई करेल.
कोरोनाची परिस्थितीबुधवारी देशात कोविड-19 ची 9,062 नवीन प्रकरणे समोर आल्याने, एकूण रुग्णांची संख्या 4,42,86,256 वर पोहोचली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,05,058 वर आली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता DGCA ने कडक पावले उचलली आहेत. राष्ट्रीय राजधानीत, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून, रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. रूग्णांची संख्या भीतीदायक नसली तरी, तज्ञांनी मास्क घालण्याची आणि इतर कोविड नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.