कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात असे अनेक रुग्ण आहेत जे लाँग कोविडचा सामना करत आहेत. त्याचबरोबर तपासणी आणि उपचार या दोन्हीमध्ये डॉक्टरांना अडचणी येत आहेत. WHO ने कोरोना व्हायरसला आता ग्लोबल हेल्थ इमर्जेन्सीमधून वगळलं आहे, परंतु बऱ्याच रुग्णांमध्ये संसर्ग कमी होत नाही.
लाँग कोविड म्हणजे कोरोनाच्या संसर्गामुळे शरीराचे अनेक भाग प्रभावित होतात. खूप वेळ असलेल्या इन्फेक्शनमुळे शरीरात इतरही अनेक आजार उद्भवतात. खोकला, सांधे आणि स्नायू दुखणे, ब्रेन फॉग आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण यांचा समावेश होतो.
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार, कोरोनाने गंभीरपणे संक्रमित झालेल्या रुग्णांपैकी ३१ टक्के रुग्ण हे उत्तर अमेरिकेतील आहेत. याशिवाय ४४ टक्के रुग्ण युरोप आणि इतर आशियातील आहेत. भारतातील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या अभ्यासातून असं समोर आलं आहे की, कोरोनातून बऱ्या झालेल्या ४५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत आहेत. त्यांना थकवा आणि खोकला यासारख्या सामान्य समस्या आहेत.
रुग्ण डॉक्टरांना सांगतात की, त्यांना आता ज्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्या समस्या कोरोना होण्यापूर्वी नव्हत्या. यामध्ये दम्यासारख्या परिस्थितींचा समावेश होतो. याशिवाय अनेकांना न्यूरोचाही त्रास होतो. लाँग कोविडचे निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी नाही. पुष्पावती सिंघानिया रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार नीतू जैन यांच्या मते, लाँग कोविड शोधण्यासाठी कोणतीही चाचणी नाही आणि त्यामुळे त्यावर उपचार करता येत नाहीत.
शिव नादर युनिव्हर्सिटीच्या टीमने शोधून काढलं की कोरोना संसर्गामुळे मेंदूच्या पेशींमध्ये जळजळ होते. मायक्रोग्लिया पेशींमध्ये नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढतं. अशा स्थितीत निद्रानाश, थकवा आणि इतर समस्या उद्भवतात. कोरोनामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.