एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा उच्चस्तर ओलांडला असून, फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात येईल, असा दावा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले की, लसीशिवाय कोरोना संपुष्टात येणे शक्य नाही.
युरोपसह अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा लाट आली असून, तेथे लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. आयआयटी आणि आयआयएसीच्या शास्त्रज्ञांनी गणितीय सूत्राच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार कोरोना फेब्रुवारी २०२१ पर्यंत संपुष्टात येण्याचे आकलन केले आहे. सोबतच त्यांनी शारीरिक अंतर राखणे आणि मास्क घालणे जरूरी असल्याचेही आवर्जून सांगितले.
राजेश भूषण यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांच्या समितीने केलेले अभ्यासपूर्ण आकलन आरोग्य मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे; परंतु तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनीही खबरदारी घेणे जरूरी असल्याचेही स्पष्ट केले आहे. ज्या गतीने कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, त्यानुसार या गणितीय सूत्रानुसार उपरोक्त समितीने आकलन केले असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य मंत्रालयही सातत्याने लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन करीत आहे.
मास्क हा एकमेव पर्यायकोरोनावरील लस येईपर्यंत आणि सर्वांचे लसीकरण होईपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, सातत्याने २० सेकंद हात साबणाने स्वच्छ धुणे हाच एकमेव पर्याय आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.