नवी दिल्ली - चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परदेशात भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची, प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल माहिती दिली. आतापर्यंत फक्त 12 देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात होती. मात्र, यापुढे जगभरातील देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे वर्धन यांनी सांगितले.
भारतात आतापर्यंत कोरोनाची 25 रुग्ण असल्याची माहिती समोर आलं आहे. त्यामध्ये 16 नागरिक इटलीतून आलेले आहेत. तर, कोरोनाच्या 3 रुग्णांवर उपचार होऊन ते घरी परतले आहेत. देशातील सर्वच प्रमुख रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले. आतापर्यंत देशातील सर्वच विमानतळांवर मिळून 5,89,000 जणांची तपासणी केली आहे. तर, तर प्रमुख आणि साधारण असलेल्या बंदरांवरही (पोर्ट) 15 हजार प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. तर, मंगळवारपर्यंत नेपाळ सीमारेषेवर 10 लाख लोकांची तपासणी केल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली.