भोपाळ - देशावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी गरिबांपासून ते उद्योजकांपर्यंत, शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वजण पुढे येत आहेत. या कोरोना विरुद्धच्या या लढ्यात सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. कुणी आपली एक महिन्याची पगार देतंय, कुणी सामाजिक बांधिलकी जपत आपली संपत्ती देतंय. कुणी पुढाकार घेऊन आवश्यक ती मदत करतंय. मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन चक्क मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 2 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाले केले.
देशात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी टाटा ग्रुपनेही पुढाकार घेतला असून भारतीय वायू सेनेनंही उड्डाण केल्याचं आपण पाहिलं आहे. ऑक्सिजनअभावी होणारा रुग्णांचा मृत्यू पाहून अनेकांना वेदना होत आहेत. त्यामुळेच, मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 2 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. या पैशातून ऑक्सिजन खरेदी करावे, अशी विनंतीही या दिलदार शेतकऱ्याने केलीय.
ग्वाल देवियान गावातील चंपालाल गुर्जर यांनी जिल्हाधिकारी मयांक अग्रवाल यांच्याकडे 2 लाख रुपयांचा निधी चेकद्वारे दिला. चंपालाल यांचा तालुका असलेल्या जिरन तहसील येथील रुग्णालयासाठी एक ऑक्सिजन टाकी मिळावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. चंपालाल यांची मुलगी अनिता हिचा येत्या रविवारी मोठ्या-धुमधडाक्यात लग्नसमारंभ पार पडणार होता. मात्र, कोरोनाची सद्यस्थिती पाहता अचानक त्यांनी आपला निर्णय बदलला. तसेच, मुलीच्या लग्नाची आठवण आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 2 लाख रुपयांचा निधी ऑक्सिजन सिलेंडर घेण्यासाठी जमा केला. वडिलांच्या या निर्णयाचा मुलीलाही आनंद झाला असून शेतकरी चंपालाल गुर्जर यांचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केलंय.