भारतात कोरोनाच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सबव्हेरिएंटने (Omicron Sub Variant BA.4 in India) शिरकाव केला आहे. देशात याचे दोन रुग्ण सापडले आहेत. हैदराबाद आणि चेन्नईमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. कोविड-19 जिनोम सिक्वेन्सिंगमुळे या दोन रुग्णांचा शोध लागला आहे.
भारताच्या SARS-CoV-2 कन्सोर्टियम ऑन जीनोमिक्सशी (INSACOG) संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितलं की, भारतातील BA.4 सब व्हेरिएंटची नोंद ९ मे रोजी GISAID वर करण्यात आली आहे. चेन्नईततील एका तरुण महिलेला मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाची लागण झाली होती. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे.
युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने ओमिक्रॉनचे BA.4 आणि BA.5 उप प्रकार चिंताजनक म्हणून घोषित केले, अनेक युरोपीय देशांमध्ये प्रकार आढळल्यानंतर वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमिक्रॉनचा BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंट जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. १२ पेक्षा जास्त देशात हा सापडला आहे.
कोरोनाच्या WHO मधील टेक्निकल प्रमुख मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कमीत कमी १६ देशांत BA.4 चे जवळपास 700 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. BA.5 चे ३०० पेक्षा अधिक प्रकरणं १७ देशांत आहेत. कोरोनाचे हे सब व्हेरिएंच अधिक संसर्गजन्य आहेत पण तितके घातक ठरले नाहीत.भारतामध्ये, तिसरी लाट BA.1 आणि BA.2 उप-प्रकारांमुळे आली होती. जागतिक डेटाच्या विश्लेषणानुसार, गेल्या 60 दिवसांमध्ये जिनोम सिक्वेंसिग केलेल्या एकूण नमुन्यांपैकी BA.2 चे प्रमाण अजूनही सुमारे 62 टक्के आहे.