पुणे : कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्वत:च्या जीवाची बाजी लावलेल्या ९९ डॉक्टरांचा देशात मृत्यू झाला आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा करणा-या, सर्व वैद्यकीय शाखांच्या डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण देशात आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर तब्बल १३०२ डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ९९ डॉक्टर कोरोनाने दगावले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय शाखेने देशभरातील डॉक्टरांसाठी रेड अलर्टची घोषणा केली आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना रुग्णसेवेत दाखल असलेल्या डॉक्टरांचे सर्वेक्षण करून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल १४०१ डॉक्टरांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. रुग्णांवर उपचार करत असताना वापरात असलेल्या संरक्षित पोषाखांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच डॉक्टरांच्या विशेष प्रशिक्षणाची मागणीही आयएमएकडून करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या १३०२ डॉक्टरांपैकी ५८६ डॉक्टर प्रॅक्टिसिंग, तर ५६६ डॉक्टर हे निवासी आहेत. रुग्णालयांतील १५० शल्यचिकित्सकांनाही करोना संसर्ग झाला आहे. मात्र, सर्वाधिक जनरल फिजिशियन डॉक्टरांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाचा सर्वाधिक धोका जनरल फिजिशियन डॉक्टरांना, निवासी डॉक्टर आणि शल्यचिकित्सकांना तो सर्वात कमी असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, 'देशातील करोनाचा मृत्युदर तीन, तर महाराष्ट्र राज्याचा तो चार टक्के एवढा आहे. तरी केवळ डॉक्टरांच्या मृत्यूचा दर मात्र आठ टक्के एवढा आहे. देशातील ९२ टक्के डॉक्टरांना करोना संसर्ग झाला आहे, हे सर्व डॉक्टर रुग्णांवर थेट उपचार करणारे डॉक्टर आहेत. मृतांमध्ये ५० वर्षांवरील वयोगटातील ७३ डॉक्टरांचा समावेश आहे. सात डॉक्टर हे ३५ पेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी रेड अलर्ट पाळून करोनाबाबत खबरदारी घेत रुग्णसेवा करावी असे आवाहन त्यांना करण्यात येत असल्याचे डॉ. उत्तुरे यांनी स्पष्ट के ले. साथरोगाच्या इतक्या महत्त्वाच्या परिस्थितीत देशातील डॉक्टरांना करोनाचा संसर्ग होणे, किंवा त्यांचे बळी जाणे आरोग्य यंत्रणांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे, हे लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही आयएमएकडून सरकारला करण्यात आले आहे.