वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत या कोरोना संसर्गाचे 3095 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, सक्रिय प्रकरणांची संख्या देखील 15208 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,47,12,752 झाली आहे. गेल्या सहा महिन्यांतील दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे.
गुरुवारी, दिल्लीत कोरोना संसर्गाची 295 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्गाचा दर 12.48 टक्के होता. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. दिल्लीत गेल्या वर्षी 31 ऑगस्टनंतर बुधवारी एका दिवसात सर्वाधिक 300 रुग्ण आढळले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. संसर्ग दर 13.89 टक्के नोंदवला गेला. दिल्ली सरकार कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी याबाबत आढावा बैठक घेणार असल्याचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, असे आश्वासनही भारद्वाज यांनी दिले. आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी कोरोनाच्या परिस्थितीबाबत बैठक घेतली. देशात H3N2 इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये तीव्र वाढ होत असताना दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोविडच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ
कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 694 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 3016 इतकी झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 184 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 98.14 टक्के इतकं आहे. राज्यात कोरोना, एच1 एन1, एच3 एन2 आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"