बंगळुरु - चीनसह जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव भारतातही सुरु झाला आहे. 70 हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र कर्नाटकातील कलबुर्गी येथील 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना देशात घडली आहे. मोहम्मद हुसैन सिद्दिकी असं या मृतकाचं नाव आहे.
मोहम्मद हुसैन सिद्दिकी नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला असावा अशी शंका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित केली आहे. मोहम्मद यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं. मात्र अद्याप केंद्रीय आरोग्य विभागाकडून मोहम्मद यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, चाचणी केल्यानंतर 76 वर्षांच्या मोहम्मद सिद्दिकी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या व्यक्तिच्या संपर्कात अन्य कोण आले होते का? याचा शोध घेणं सुरु आहे. याशिवाय सिद्दिकीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तेलंगणा सरकारलाही देण्यात आली आहे. सिद्दीकी हे तेलंगणाच्या रुग्णालयात उपचारासाठी गेले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 76 वर भारतातील सात राज्यांत कोरोना विषाणूची लागण झाल्याची प्रकरणं दिवसेंदिवस समोर येत आहेत. गुरुवारी देशात कोरोना लागण झालेल्या लोकांची संख्या 76 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 16 नवीन प्रकरणांपैकी 11 महाराष्ट्रातील नोंदवले गेले आहेत, तर दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एक नोंद झाली आहे. एका परदेशी नागरिकालादेखील कोरोना संक्रमित झाल्याचं आढळलं आहे.
जगभरात आतापर्यंत 4600 मृत्यू कोरोनाने जगभरात कमीतकमी 4,600 लोकांचा बळी घेतला आहे आणि सुमारे 1,25,293 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घाबरू नका असं आवाहन केले आहे.