भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये घट होत आहे. तसेच, जगातील अनेक देशांमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. अशा परिस्थितीत बर्याच देशांनी आता भारतीयांसाठी आपल्या सीमा उघडल्या आहेत. येत्या आठवड्यापासून भारतीय पर्यटक या देशांमध्ये प्रवासासाठी जाऊ शकतात. भारतीयांसाठी आपल्या देशात प्रवेश देणाऱ्यांच्या यादीत कॅनडा, मालदीव, जर्मनी यांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान बर्याच देशांनी भारतातील नागरिकांसाठी प्रवेश बंदी घातली होती. (indians can visit these countries from next week)
कॅनडा : कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य एजन्सीने 3 जुलै रोजी जाहीर केले की, केवळ नागरिक आणि देशातील कायमस्वरुपी रहिवाशांसाठी प्रवासी निर्बंध शिथित करीत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, स्थानिक रहिवासी यांचे नातेवाईक आणि तात्पुरते कामगार यांना वैध वर्क परमिट सुलभ करण्याच्या उद्देशाने या कारवाईचे उद्दिष्ट आहे. तसेच, भारतीयांसह सर्व प्रवाशांना कॅनडामध्ये प्रवेश केल्याच्या 72 तासांच्या (3 दिवस) आत निगेटिव्ह कोरोनाची चाचणी केल्या अहवाल अनिवार्यपणे सादर करावा लागेल.
देशात प्रवेश करणाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. सध्या, कॅनडा सरकारने मॉडर्न, फायझर-बायोटेक, अॅस्ट्राजेनेका / कोव्हिशिल्ड आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना मान्यता दिली आहे. भारताची देशी लस कोव्हॅक्सिन आणि रशियन-निर्मित स्पुतनिक व्ही या लसींना अद्याप कॅनडाने मंजूरी दिलेली नाही.
जर्मनी :भारतातील जर्मनीचे राजदूत वाल्टर जे लिंडनर यांनी मंगळवारी सांगितले की, भारतासह डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झालेल्या पाच देशांवरील निर्बंध देशाने हटविले आहेत. आता भारतीय प्रवाशांना, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा जे व्हायरसपासून बरे होण्याचे पुरावे दाखवू शकतात, त्यांना आता जर्मनीत प्रवेश केल्यानंतर सेल्फ क्वारंटाइन राहण्याची गरज नाही.
मालदीव :मालदीवसाठी विमान सेवा 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. प्रवाशांना अनिवार्यपणे एक निगेटिव्ह आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट घ्यावा लागेल. कोरोना रिपोर्ट दाखविल्यानंतर मालदीवमध्ये सेल्फ क्वारंटाइन राहण्याची गरज भासणार नाही.