नवी दिल्ली: चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही 25 संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कोरोना व्हायरसचं आलेलं संकट कधीतरी निघून जाईल, पण या आजारामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकता येईल असं मत देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. यामध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देईल. तसेच डिजीटल परिषदचे प्रमाण वाढेल, कंपनीच्या मीटिंगच्या ऐवजी व्हिडिओ कॉलवरुनच संपर्क साधण्याचे प्रमाणात वाढ होईल, विमान वाहतुकीच्या प्रमाणात घट होईल आणि यामुळे प्रदूषण देखील टाळता येईल असं मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना व्हायरस टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं देखील नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे जाहीर केले आहे.
कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीत कोरोनाचे रुग्ण बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना एकांतवासात वा रुग्णालयातच ठेवावे, अशा सूचना आहेत.
रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, इंडोनेशिया, ब्रिटन युरोपियन युनियन अशा किमान 60 देशांत कोरोना फैलावला आहे. त्यामुळे या सर्व देशांत अनेक निर्बंध घालण्यात आले असून, तेथील जवळपास सर्व सार्वजनिक समारंभ, क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.