वाराणसी - देशातील सर्वात लोकप्रिय धार्मिकस्थळ असलेल्या वाराणसी येथील काशी के कोतवाल या नावाने प्रसिद्ध असलेल्या बाबा कालभैरव यांना पोलिसांची वर्दी परिधान करण्यात आली आहे. बाबा कालभैरव यांच्या डोक्यावर पोलिसांची वर्दी, छातीवर एक बिल्ला, डाव्या हातात एक चांदीचा दंडुका आणि उजव्या हातात एक रजिस्टर दिसून येते. कालभैरव बाबाला पोलिसांची ड्रेसमध्ये सजविण्यात आले आहे. कालभैरव बाबाचा हा नवीन अवतार पाहण्यासाठी लोकांनी मंदिरात गर्दी केली आहे.
सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येथील मंदिर परिसरात कालभैरव बाबांच्या दर्शनासाठी नागरिक गर्दी करत आहेत. जर रजिस्टर आणि पेन घेऊन बाबा दिसत असतील, तर कोणाचीही तक्रार दुर्लक्षीत राहणार नाही, अशी येथील लोकांची धारणा आहे. तसेच, कोविड महामारीकडे बाबा लक्ष देतील. या मंदिराचे मंहत अनिल दुबे यांनी सांगितले की, बाबा कालभैरव यांना पहिल्यांदाच पोलिसांचा गणवेश परिधान करण्यात आला आहे. त्यामुळे, भाविक भक्तांमध्ये बाबा कालभैरव यांचे नवीन रुप पाहायची उत्सुकता लागली आहे.
महंत अनिल दुबे म्हणाले की, देशातील जनतेचं कोरोनापासून बचाव करण्यासाठी वाराणसीचे प्रसिद्ध कालभैरव मंदिरात विशेष पुजेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वांवर दया करावी, अशी प्रार्थनाही बाबांकडे करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि देशात सुख-समृद्धी राहावी, कुणालाही कुठलिही अडचण असू नये, अशी प्रार्थनाही बाबांकडे केल्याचं दुबेंनी सांगितलं.